इतिहास व मंदिराचे महत्त्व
श्री रेडा समाधी, वारकरी परंपरा आणि मंदिर विकास — संपूर्ण वृत्तांत खाली.
येऊनी उतरली आळाचिये वनीं । पशु तये स्थानी शांत झाला ।। करूनी तया पुजन सेंदुर तेलें लेपुन । आळंकावती निजस्थान प्रवेशलीं ।।
संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी श्रीक्षेत्र आळे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या श्री रेडा समाधी स्थळाचे वर्णन वरीलप्रमाणे आपल्या अभंगात केलेले आहे.
श्री विठ्ठलपंत कुलकर्णी व रुक्मिणीमाता यांचा विवाह झाल्यानंतर आळंदीत सुखाने संसार करत होते. परंतु विठ्ठलपंतांना विरक्ती झाल्याने त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यास घेतला. परंतु ते संसारी असल्याचे कळाल्याने त्यांच्या गुरूंनी त्यांना परत गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगितले. परत गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर उभयतांनी निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर महाराज, सोपानकाका, मुक्ताबाई चार मुलांना जन्म दिला.
विठ्ठल पंतांनी संन्यास घेतल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारल्याचे आळंदीतील धर्म पंडीतांना मान्य झाले नाही. त्यांनी या सर्वांना धर्मातून बहिष्कृत केले व त्यासाठी त्यांना विठ्ठलपंत व रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्त घेण्याची शिक्षा दिली. त्याप्रमाणे उभयतांनी देहांत प्रायश्चित्त घेतले. परंतु त्यानंतरही आई-वडीलांविना पोरक्या झालेल्या त्यांच्या मुलांना आळंदीतील धर्म मार्तंडांनी धर्मात घेण्यास नकार दिला व त्यांचा विविध प्रकारे छळ सुरू केला.
त्या काळी पैठण या ठिकाणी धर्मशास्त्राच्या परिषदा भरत असत. आळंदीतील धर्म मार्तंडांनी श्री संत ज्ञानेश्वरादी भावंडांना पैठण येथील धर्मसभेचे शुद्धिपत्र मागीतले. त्या करीता श्री संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे पैठण येथे गेले असता तेथील धर्मसभेमध्ये ही त्यांना अनेक सत्व परिक्षांना तोंड द्यावे लागले.
त्याच प्रसंगी धर्मसभेसमोरुन वाकोबा नावाचा कोळी आपल्या ग्यानोबा नामक रेड्याला घेऊन जात होता. धर्म सभेत वाद विवाद चालू असताना एका धर्मपंडीताचे लक्ष त्या रेड्याकडे गेले. तेव्हा त्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना विचारले जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व पशुमात्रामध्ये आत्मा असेल आणि तो जर परमात्मा असले तर त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे का?
या प्रश्नावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी होय असे उत्तर दिल्यानंतर त्याच धर्म पंडीताने तुला बोलता येते त्या प्रमाणे रेड्यालाही बोलता येईल का? मग तुला अधिकार नसतानाही तू वेद बोलतो तसे वेद त्याच्याकडून बोलून दाखव असे आव्हान दिले. त्या नंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा घेतली व त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून वेद उच्चारण्याची आज्ञा केली आणि चमत्कार होऊन तो रेडा वेद बोलु लागला. त्या रेड्याच्या मुखातून लगेचच प्रथम वेद ऋग्वेदाच्या पुढील श्रृती बारे पडल्या-ओम अग्निमुळे पुरोहित यज्ञस्य देव मृत्विजम । घेतार रत्न धाततम ।। तेव्हापासून हा रेडा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रथम शिष्य झाला.
या चमत्काराने पैठण मधील धर्मसभेतील सर्व धर्मपंडीत चकित झाले. रेड्याच्या मुखातुन होणारे वेदांचे शुद्ध उच्चार ऐकून अनेक पंडीतांनी आपल्याकडील वेदांच्या प्रति दुरुस्त केल्या या चमत्काराने प्रभावित होऊन धर्मसभेने श्री संत ज्ञानदेव व त्यांच्या भावंडांना शुद्धिपत्र बहाल केले. हा चमत्कार मघा शु. ५, शके १२०९ या दिवशी पैठण या ठिकाणी घडला.
शुद्धिपत्र घेऊन श्री संत ज्ञानेश्वर व भावंडे पैठणवरून नेवासाकडे आले. त्या वेळी त्यांच्या समवेत रेडा व त्याचे मालक बरोबरच होते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुच्या आज्ञेने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लेखन केले.
हे कार्य संपल्यानंतर सर्वजन समवेत असणाऱ्या साधु संतांसमवेत आळंदीकडे जाण्यासाठी निघाले. त्यांच्या समवेत असणारा रेडा हा सतत वेदघोष करत होता. ही सर्व मंडळी आळेगावच्या उत्तरेला असलेल्या संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरावर विसावा घेत असताना माऊलींनी समोरील भूमीचे निरीक्षण केले. वर्तुळाकार अशी निसर्गसंपन्न भूमी पाहून या भूमीचे नामकरण "आळे" असे केले. या भूमीची पवित्रता पाहून रेड्याने आपल्याला याच ठिकाणी समाधी द्यावी अशी इच्छा माऊलींकडे प्रदर्शित केली. रेड्याला समाधी देण्यासाठी व वेदांना शांत करण्यासाठी ही भूमी योग्य असल्याने माऊलींनी रेड्याच्या इच्छेप्रमाणे त्यास याच ठिकाणी समाधी देण्याचे ठरविले व अशा प्रकारे रेड्याने भगवंताच्या इच्छेने व स्वसामर्थ्याने इच्छीत वेळी, इच्छीत स्थळी आपल्या प्राणाचे पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत आकर्षण करून माघ वद्य ३, शके १२१२ इ.स. १२९० रोजी देहत्याग केला. त्यानंतर त्याच्या पार्थिवाला श्री ज्ञानेश्वर महाराज व भावंडांनी समाधीस्थ केले.
श्री रेडा समाधीला श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई या चारही भावंडाचे हात लागलेले असुन पृथ्वी तलावरील ही अशी एकमेव पशूची समाधी आहे. ही शिळा रेड्याची समाधी शिळा असून ७३५ वर्षांपूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांनी समाधीवर स्वहस्ते स्थापन केली आहे.
समाधी नसे ही पार्थिवासी । मूर्तीमंत सत स्वयंभु प्रचीतीची ।। म्हणूनच संत निळोबारायांनी "पशु आळीयासी स्थापीयेला" असे म्हणून "निळा म्हणे धन्य आळे ग्रामवासी । ज्ञानियासी पासी ठेवोनीया ।। अजान वृक्ष तेथे ठेवियेली खुण। झाले निरुपन निवेदन ।।" असे आपल्या अभंगामध्ये आळेगावाचे वर्णन केलेले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज त्यांची भावंडे व समवेत असलेल्या संतमंडळींनी या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करून या भूमीला पवित्रता आणली. त्यानंतर आळंदीकडे जात असताना आंबेगाव तालुक्यातील चासनारुडी या ठिकाणी या रेड्याची दशक्रियाही केली.
तदनंतर श्री चांगदेव महाराज हे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या व भावंडांच्या भेटीसाठी पुनतांबेवरुन आळंदीला जात असताना त्यांनी सुद्धा त्या समाधीचे दर्शन केलेले असल्याचे वर्णन संत निळोबारायांनी " आळे खिंडीवरुनी चालीयेले भार । केला नमस्कार म्हैसीपुत्रा ।। असे केले आहे. ही समाधी अतिशय प्राचीन असून रेड्याचे समाधी स्थान व वेदांनांही शांत करणारे ठिकाण म्हणून हे तीर्थक्षेत्र ओळखले जाते. ज्या वारकऱ्यांची पंढरपूर आळंदी वारी चुकते ते वारकरी आळ्याची वारी करून वारीचे पुण्य पदरात घेतात. आळंदी व पंढरपूरच्या खालोखाल या क्षेत्रास महत्त्व असल्याने समाधीस्थळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असावी या करीता आळे, संतवाडी, कोळवाडी ग्रामस्थांनी समाधी गाभाऱ्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची दि. ५ मार्च १९५५ रोजी प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे भाविकांचे प्रथम विठ्ठल रुक्मिणी (पंढरपूर) नंतर माऊलींचे (आळंदी) व नंतर श्री रेडा समाधीचे (आळ्याचे) दर्शन होते.
या प्राचीन मंदिरामध्ये वर्षभरात अनेक दैनंदिन नित्यक्रम सुरू असतात. दर महिन्याचे शुद्ध व वद्य एकादशीला कीर्तन, प्रवचन होवून अन्नदान केले जाते.
याची जबाबदारी पुणे व नगर जिल्ह्यातील २७ गावांकडे आहे. त्याप्रमाणे ज्या गावाकडे जबाबदारी असेल त्या गावचे ग्रामस्थ एकादशीचे दिवशी मंदिरामध्ये येऊन भजन कीर्तन करून फराळ वाटप करतात व दुसऱ्या दिवशी द्वादशीचे पारणे फेडण्यासाठी अन्नदान करत असतात.
या ठिकाणी सतत अखंड विनाप्रहर व नंदादिप आजतागायत चालू आहे. रेड्याच्या समाधी कालावधीमध्ये म्हणजेच महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मंदिर परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते व महाशिवरात्रीचे दिवशी दुपारी १२.३० वाजता समाधी वेळ मानून समाधीवर पुष्पवृष्टी केली जाते. या सप्ताहमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आपली सेवा देत असतात.
चैत्र वद्य एकादशी पासून चैत्र वद्य त्रयोदशीपर्यंत तीन दिवसांची यात्रा या ठिकाणी भरत असते.
यात्रेच्या पहिल्या दिवशी एकादशी असल्याने आजूबाजूच्या अनेक गावचे वारकरी दिंडी घेऊन येत असतात व रात्री आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन करून रात्रभर भजन, भारुडे होऊन हरी जागर करत असतात.
दुसऱ्या दिवशी द्वादशीला सर्व वारकरी व यात्रेकरूंना अन्नदान करण्यात येते. त्याच दिवशी दुपारी महाराष्ट्रातील नामवंत पहिलवानांचा कुस्त्यांचा आखाडा होत असतो.
त्रयोदशीला दुपारी काल्याचे कीर्तन होऊन वाळवंटामध्ये दहीहंडी फोडली जाते व सायंकाळी पाऊल घडीचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होत असते.
पंढरपूर व आळंदी पायीवारीचे नियोजन प्रतिवर्षी देवस्थान मार्फत केले जाते. आळंदी व पंढरपूर या ठिकाणी संस्थेच्या स्वतःच्या जागा असुन त्याही ठिकाणी अद्ययावत धर्मशाळा देवस्थान मार्फत बांधण्यात आलेल्या आहे.
तसेच दर माघ शुद्ध पंचमीला मंदिरामध्ये चारही वेदांचे पठण केले जाले.
या समाधीस्थळी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असून त्यांच्यासाठी सोईसुविधा पुरवण्यासाठी देवस्थान ट्रस्ट प्रयत्न करीत असते. महाराष्ट्र शासनाने या तीर्थक्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राला "ब" दर्जा दिलेला आहे.
त्या अंतर्गत मिळालेल्या निधीतून विविध विकासकामे चालू आहे. मंदिरापुढील विनामंडप जीर्ण झालेला होता. तो काढून त्या ठिकाणी दगडी घडीव विनामंडपाचे काम सुरू आहे. मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार केलेला असून अनेक देणगीदारांच्या माध्यमातून तो पूर्णत्वास जात आहे.
सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की, आपणही आपल्या श्रद्धेनुसार देणगीरूपाने योगदान देऊन मंदिराच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे.
- माघ शु. ५, शके १२०९ (इ.स. १२८७)पैठण येथे रेड्याने वेदोच्चार; धर्मसभेने शुद्धिपत्र — या दिवशी घडलेला चमत्कार.
- माघ व. ३, शके १२१२ (इ.स. १२९०)आळे येथे श्री रेडा समाधी — चारही भावंडांनी पार्थिवाची समाधी स्थापन केली.
- फाल्गुन शु. १३, शके १८७६ (५ मार्च १९५५)आळे, संतवाडी, कोळवाडी ग्रामस्थांनी समाधी गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत ज्ञानेश्वर मूर्तींची प्राणप्रतिष्ठा.
वारकरी परंपरा, महाशिवरात्री, चैत्र यात्रा, एकादशी-द्वादशी व २७ गावांची सेवा यांचा तपशील वरील मजकुरात आला आहे.